MPSC Exam Changes 2026 : एमपीएससी : बदल हवेत… पण कोणते? विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि सविस्तर विश्लेषण |
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा काळ म्हणजेच साधारणपणे 2 ते 3 वर्षे या ध्येयासाठी खर्च करतो. त्याच्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम हा केवळ पुस्तकांची यादी नसून, ती त्याच्या आयुष्याची पुढील काही वर्षांची संपूर्ण योजना असते. त्यामुळे परीक्षा पद्धतीतील प्रत्येक बदल हा केवळ एक प्रशासकीय निर्णय राहत नाही, तर तो लाखो विद्यार्थ्यांच्या नियोजनावर, मानसिकतेवर आणि पर्यायाने त्यांच्या भविष्यावर थेट परिणाम करणारा निर्णय ठरतो.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 2025 पासून राज्यसेवा मुख्य परीक्षेत मोठे बदल जाहीर केले आहेत. मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय वगळणे, संगणकाधारित (CBT) पूर्वपरीक्षा, वर्षातून एकापेक्षा अधिक पूर्वपरीक्षा घेणे, आणि गुणांचे समानीकरण (नॉर्मलायझेशन) अशा अनेक महत्त्वपूर्ण बदलांची घोषणा करण्यात आली आहे. या बदलांना विरोध करणे हा उद्देश नसून, हे बदल कोणत्या तर्कावर, कोणत्या अभ्यासावर आणि कोणत्या प्रक्रियेनंतर होत आहेत, हा मुख्य प्रश्न आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2025 पासून हे मोठे बदल होणार असल्याचे जाहीर केले असले, तरी त्याचे ‘तपशील नंतर जाहीर केले जातील’ असे म्हटले आहे. आयोगाकडून अपेक्षित स्थिर, पारदर्शक परीक्षा पद्धती आणि सद्यस्थितीतील अंतर यावर प्रकाश टाकणारा हा सविस्तर लेख आहे. MPSC Exam Changes 2026
१. विद्यार्थ्यांना नेमके काय हवे आहे?
गेल्या काही वर्षांतील विद्यार्थ्यांची आंदोलने, चर्चा आणि त्यांच्या मागण्या पाहिल्या तर त्यात कुठेही ‘दर काही वर्षांनी परीक्षा पद्धती बदला’ अशी मागणी नव्हती. विद्यार्थ्यांची अपेक्षा अगदी स्पष्ट आणि सरळ आहे:
- परीक्षा वेळेत घ्याव्यात.
- परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत.
- भरती प्रक्रिया ठरावीक वेळेत पूर्ण करावी.
- परीक्षा पद्धतीत स्थैर्य असावे.
- दर्जेदार आणि संतुलित प्रश्नपत्रिका असाव्यात.
- मूल्यमापनात पूर्ण पारदर्शकता असावी.
- मुलाखतीतील गुणांचे निकष अधिक स्पष्ट असावेत.
- आयोगावर विश्वास ठेवता येईल अशी परीक्षा व्यवस्था उभी करावी. MPSC Exam Changes 2026
परंतु, या न्याय्य मागण्यांच्या उलट गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांना सातत्याने नियमांमधील बदल, अभ्यासक्रमातील बदल, परीक्षेच्या स्वरूपातील बदल आणि प्रक्रियेत बदल या गोष्टींना सामोरे जावे लागले आहे. या सततच्या बदलांमुळे व्यवस्थेत स्थैर्याऐवजी अनिश्चितता वाढत गेली आहे.
२. बदलांची ही अखंड मालिका आणि युपीएससीशी तुलना
गेल्या काही वर्षांतील इतिहास पाहिला तर MPSC च्या इतिहासात अनेक मोठे बदल पाहायला मिळतात. दळवी समितीच्या शिफारशींनंतर राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप मोठ्या प्रमाणावर ‘यूपीएससी’ (UPSC – संघ लोकसेवा आयोग) च्या धर्तीवर नेण्यात आले होते. मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषय आणले गेले, अभ्यासक्रम बदलला आणि प्रश्नपत्रिकांची रचनाही बदलली गेली. त्यावेळी या बदलांना विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला होता, आंदोलने झाली होती, आणि त्या वेळी प्रशासनाने व राजकीय नेत्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता.
त्या वेळी या बदलांचे समर्थन करताना असा तर्क मांडण्यात आला होता की, राज्यसेवा परीक्षा ‘यूपीएससी’च्या अधिक जवळ नेल्यास महाराष्ट्रातील अधिक विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यशस्वी होतील, अभ्यासाचे स्वरूप अधिक सुसंगत होईल आणि विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक गुणवत्ता वाढेल. मात्र, हा निर्णय लागू होऊन काही वर्षे होत नाहीत तोच, अब मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर पूर्वीचा तर्क योग्य होता, तर आताचा हा बदल का? आणि जर तो अपुरा किंवा चुकीचा ठरला होता, तर त्याची कारणीमांसा काय? हे प्रश्न उपस्थित होतात.
महत्त्वाचा प्रश्न: एखादा धोरणात्मक बदल करताना त्यामागील विचार, पूर्वअनुभव आणि निष्कर्ष सार्वजनिकपणे मांडले गेले पाहिजेत. अन्यथा, हे बदल अभ्यासाअंती न वाटता मनमानी वाटू लागतात. MPSC Exam Changes 2026
३. वर्षातून दोन पूर्वपरीक्षा : नेमका उद्देश काय?
नवीन घोषणेनुसार पूर्वपरीक्षा वर्षातून 2 किंवा अधिक वेळा घेण्याचा विचार आयोग करत आहे. ही कल्पना प्रथमदर्शनी खूप आकर्षक आणि विद्यार्थ्यांच्या हिताची वाटू शकते. परंतु, यामागचा मूळ उद्देश काय आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. कारण मुख्य परीक्षा तर वर्षातून एकदाच होणार आहे.
- मग पूर्वपरीक्षा दोनदा घेऊन नेमका कोणता फायदा होणार?
- पूर्वपरीक्षेच्या केवळ संधी वाढणार आहेत का?
- रिक्त पदांची संख्या वाढणार आहे का?
- निवड प्रक्रिया जलद होणार आहे का?
- विद्यार्थ्यांना नेमका कोणता फायदा होणार?
यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे आयोग स्वतःही किती पूर्वपरीक्षा घेणार, याबाबत निश्चित भूमिका मांडत नाही. अनेक तपशील ‘योग्य वेळी जाहीर केले जातील’ असे सांगितले जात आहे. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी हीच सर्वात मोठी समस्या असते. विद्यार्थी 2 ते 3 वर्षांचा अभ्यास आराखडा तयार करत असतो, अशा वेळी ‘तपशील पुढे सांगू’ ही भूमिका त्याच्यासाठी अनिश्चितता निर्माण करते. धोरण जाहीर करण्यापूर्वी ते पूर्णपणे निश्चित असणे हीच सुशासनाची प्राथमिक अट आहे.
४. समानीकरण (नॉर्मलायझेशन) : संकल्पना योग्य, पण अंमलबजावणीचे काय?
वर्षातून 2 किंवा अधिक पूर्वपरीक्षा झाल्यास प्रत्येक परीक्षेची प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या दिवशी आणि वेगवेगळ्या सत्रात होईल. सर्व प्रश्नपत्रिका समान कठीण किंवा समान सोप्या असतीलच असे नाही. त्यामुळे वेगवेगळ्या सत्रांतील विद्यार्थ्यांची न्याय्य तुलना करता यावी म्हणून सांख्यिकीय पद्धतीने गुणांचे रूपांतर केले जाते, ज्याला ‘समानीकरण’ (नॉर्मलायझेशन) म्हणतात.
ही संकल्पना चुकीची नाही आणि जगभरातील अनेक नामांकित स्पर्धा परीक्षांमध्ये (उदा. CAT, Banking, JEE) तिचा वापर केला जातो. मात्र, तिचे यश हे पूर्णपणे अंमलबजावणीवर अवलंबून असते. त्यासाठी खालील गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत:
1. अत्यंत विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था.
2. उच्च दर्जाच्या आणि संतुलित प्रश्नपत्रिका.
3. मोठा परीक्षार्थी डेटा.
4. अचूक सांख्यिकीय प्रक्रिया.
म्हणूनच प्रश्न समानीकरणाच्या तत्त्वाचा नाही, तर ते राबवणाऱ्या संस्थेवरील या विश्वासाचा आहे. आयोगाने कोणती पद्धत वापरणार, तिचा परिणाम कसा होणार व ती विद्यार्थ्यांसाठी न्याय्य कशी ठरणार, याबाबातची माहिती सार्वजनिक करणे अत्यंत आवश्यक आहे. MPSC Exam Changes 2026
५. मुलाखतीच्या गुणांतील विसंगती आणि वाढता प्रभाव
काही वर्षांपूर्वी मुलाखतीच्या गुणांचे सापेक्ष महत्त्व कमी करण्यामागे आयोगाचा स्पष्ट तर्क होता. मुलाखतीचे मूल्यमापन वेगवेगळ्या मंडळांनुसार (Boards) बदलू शकते; ती पूर्णपणे वस्तुनिष्ठ प्रक्रिया नसते. त्यामुळे अंतिम गुणवत्तेत तिचे प्रमाण मर्यादित असावे, असे मानले गेले होते.
परंतु आता नवीन बदलांनुसार, मुख्य परीक्षेतून वैकल्पिक विषय काढून टाकल्यामुळे मुख्य परीक्षेचे एकूण गुण कमी झाले आहेत; मात्र मुलाखतीचे गुण पूर्वीइतकेच ठेवण्यात आले आहेत. परिणामी, अंतिम गुणवत्तेत मुलाखतीचे गुण सापेक्ष प्रभाव (Relative Weightage) वाढवणार आहेत. मग या ठिकाणी पूर्वीचा तर्क आता लागू होत नाही का? जर आयोगाचा दृष्टिकोन बदलला असेल, तर त्यामागील कारणेही स्पष्टपणे मांडली गेली पाहिजेत. मुलाखतीत दिलेल्या गुणांचे स्पष्टीकरण, मूल्यांकनाचे निकष आणि उत्तरदायित्व वाढविण्याची विद्यार्थ्यांची जुनी मागणी अजूनही कायम आहे. विश्वास वाढवायचा असेल तर पारदर्शकतेलाही तितकेच महत्त्व द्यावे लागेल.
६. सर्वात मोठी समस्या : स्थैर्याचा अभाव (Lack of Stability)
या संपूर्णर्चेतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा वैकल्पिक विषय, ‘CBT’ किंवा समानीकरण हा नसून तो म्हणजे ‘स्थैर्याचा अभाव’ हा आहे. स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी अभ्यासक्रम समजून घेतो, संदर्भग्रंथ ठरवतो, उत्तरलेखनाचा सराव करतो आणि वर्षानुवर्षे तयारी करतो. तोपर्यंत परीक्षा पद्धतीच वारंवार बदलली, तर मेहनतीपेक्षा अनिश्चिततेचे महत्त्व वाढते. गुणवत्तेपेक्षा नशिबाचा वाटा वाढण्याचा धोका निर्माण होतो. सार्वजनिक परीक्षा व्यवस्थेचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या तयारीला दिशा देणे असते; सतत नवी दिशा दाखवणे नव्हे. MPSC Exam Changes 2026
७. बदलांचा खरा अर्थ आणि आयोगाची जबाबदारी
परीक्षा व्यवस्था बदलली पाहिजे, यात शंका नाही. कारण समाज बदलतो, प्रशासन बदलते आणि तंत्रज्ञान बदलते. त्यामुळे परीक्षा देखील बदलणारच. पण सुधारणा म्हणजे केवळ नियम बदलणे नव्हे, तर सुधारणा म्हणजे अभ्यासपूर्ण निर्णय, सार्वजनिक चर्चा, स्पष्ट आराखडा, संक्रमणासाठी पुरेसा कालावधी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘विश्वास निर्माण करणे’ होय.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग केवळ परीक्षा घेणारी संस्थात्मक यंत्रणा नाही; तर तो राज्याच्या प्रशासकीय कण्याची निवड करणारा एक घटनात्मक आयोग आहे. तो केवळ विद्यार्थ्यांप्रति नव्हे, तर संपूर्ण समाजाप्रति उत्तरदायी आहे. आयोगाने निवडलेले अधिकारी पुढील अनेक दशके शासन चालवतात. त्यांच्या निर्णयक्षमतेचा, सचोटीचा, प्रामाणिकतेचा आणि सार्वजनिक मूल्यांप्रती असलेल्या बांधिलकीचा परिणाम थेट नागरिकांच्या आयुष्यावर होत असतो.
म्हणूनच आयोगाने केवळ परीक्षापद्धती बदलण्यावर भर न देता स्वतःच्या निवड प्रक्रियेचेही वेळोवेळी मूल्यमापन केले पाहिजे. 5 ते 10 वर्षांनी आयोगाने स्वतःलाच प्रश्न विचारला पाहिजे –
आपण निवडलेला अधिकारी वर्ग प्रशासनात कितपत यशस्वी ठरला?
त्याची कार्यक्षमता, सचोटी, भ्रष्टाचाराबाबतची प्रतिमा आणि लोकाभिमुखता कशी आहे?
निवड प्रक्रियेत सुधारणेची गरज आहे का? MPSC Exam Changes 2026
निष्कर्ष
अशी आत्मपरीक्षणाची संस्कृती कोणत्याही सक्षम सार्वजनिक संस्थेची ओळख असते. “समाजच असा आहे, त्यामुळे काही प्रमाणात भ्रष्टाचार होणारच,” या भूमिकेत आयोगाला आश्रय घेता येणार नाही. कारण समाजाला योग्य दिशा देणाऱ्या अधिकारी वर्गाची निवड करण्याची घटनात्मक जबाबदारी आयोगावर आहे. त्यामुळे परीक्षा पद्धतीतील प्रत्येक बदल हा केवळ प्रशासकीय प्रयोग नसून राज्याच्या भविष्यातील प्रशासनाची पुनर्रचना असते.
विद्यार्थ्यांचा विरोध बदलाला नाही, तर वारंवार बदलणाऱ्या नियमांना, अपूर्ण घोषणांना आणि वाढत्या अनिश्चिततेला आहे. त्यांना नवा अभ्यासक्रम मान्य आहे, नवीन तंत्रज्ञानही मान्य आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांना स्थिर, विश्वासार्ह, उत्तरदायी आणि विचारपूर्वक विकसित केलेली परीक्षा व्यवस्था हवी आहे. कारण शेवटी विद्यार्थी आयोगाकडून केवळ नवीन परीक्षा मागत नाहीत; तर ते विश्वास ठेवता येईल असा आयोग मागत आहेत.

