MPSC 2026 Result Makes History ! : एमपीएससीने रचला इतिहास! नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल अवघ्या 22 दिवसांत; स्पर्धा परीक्षा विश्वातून आश्चर्य आणि समाधान
नेहमी लांबणाऱ्या परीक्षा आणि निकालांच्या दिरंगाईमुळे सातत्याने टीकेचे धनी ठरणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) यंदा एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व कामगिरी करून दाखवली आहे. आयोगाने घेतलेल्या ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2026′ (राज्य सेवा गट-अ व गट-ब) चा निकाल अवघ्या 22 दिवसांत, म्हणजेच 22 जून रोजी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे. एमपीएससीच्या संपूर्ण इतिहासात पहिल्यांदाच इतक्या जलद गतीने निकाल लागल्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून मोठे आश्चर्य आणि समाधान व्यक्त केले जात आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगालाही (UPSC) टाकले मागे
सामान्यतः केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) निकाल हे खूप वेगवान मानले जातात, जे साधारणपणे 23 दिवसांत जाहीर होतात. मात्र, आता एमपीएससीने अवघ्या 22 दिवसांत निकाल लावून केंद्रीय आयोगाच्या गतीलाही मागे टाकले आहे. ही कामगिरी महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरणार आहे.
निकाल जलद लागण्याचे मुख्य कारण काय?
गेल्या काही काळापासून परीक्षांचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे आणि निकाल रखडल्यामुळे एमपीएससीवर राज्य सरकार, विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने तीव्र टीका होत होती. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने एमपीएससीच्या परीक्षा आणि निकालांना गती देण्यासाठी, तसेच त्यात सुसूत्रता आणण्यासाठी एक नवीन धोरण आखून एक विशेष कार्यक्रम तयार केला होता. याच नवीन धोरणामुळे हा ऐतिहासिक निकाल इतक्या वेगाने लावणे शक्य झाले आहे.
मुख्य परीक्षेसाठी अर्ज व महत्त्वपूर्ण सूचना (MPSC Mains Exam Important Instructions)
पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी आयोगाने काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत, ज्या खालीलप्रमाणे आहेत:
- पात्रता तपासणी आणि अर्ज: पूर्व परीक्षेच्या अर्जात उमेदवारांनी जी माहिती दिली होती, त्या आधारे आणि त्यांच्या पात्रता तपासणीच्या अटींच्या अधीन राहूनच उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. या पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी विहित मुदतीत (दिलेल्या वेळेत) पुन्हा अर्ज करावा लागणार आहे.
- सविस्तर अधिसूचना लवकरच: मुख्य परीक्षेच्या संदर्भातील सविस्तर अधिसूचना (Notification) आणि अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया आयोगाकडून स्वतंत्रपणे आणि लवकरच जाहीर केली जाईल.
- आरक्षण आणि न्यायालयीन याचिका: सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या (SEBC) आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिका, तसेच इतर आरक्षणांसंदर्भात न्यायाधिकरणात (Tribunals) प्रलंबित असलेल्या न्यायिक प्रकरणांमधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहूनच हा पूर्व परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे, अशी स्पष्ट सूचना आयोगाने दिली आहे. MPSC 2026 Result Makes History !
कट-ऑफ आणि गुण संकेतस्थळावर उपलब्ध
पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांची नावे, त्यांचे बैठक क्रमांक (Roll Numbers) आणि कट-ऑफ मार्क्स (गुणांची सीमाषा) आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार तिथे जाऊन आपले गुण आणि निकाल तपासू शकतात.
टीप: मुख्य परीक्षेच्या पुढील अपडेट्ससाठी उमेदवारांनी एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी. MPSC 2026 Result Makes History !